अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
चाळीसगाव(प्रतिनिधी)- चाळीसगाव नगरपरिषद पंचवार्षिक निवडणूक २०२५ मध्ये पराभूत झालेल्या उमेदवारांची आज चाळीसगाव येथे संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत निवडणुकीत मतदार राजांनी दिलेल्या कौलाचा सन्मान राखत, लोकशाही मूल्यांना अधोरेखित करणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
निवडणुकीत विजय न मिळाला तरीही आपल्या-आपल्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मूलभूत सोयी-सुविधांसाठी सतत कार्यरत राहण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. याच अनुषंगाने ‘प्रतिनगरसेवक’ ही नाविन्यपूर्ण संकल्पना दिलीप घोरपडे यांनी मांडली. तर नगरपालिकेच्या कामकाजावर लोकहिताच्या दृष्टीने लक्ष ठेवत प्रशासनाकडून प्रश्न कसे मांडता येतील, याबाबत ‘प्रतिनगरपालिका’ स्वरूपात कामकाज कसे करता येईल, यावर घृष्णेश्वर पाटील यांनी सविस्तर विचार मांडले.
नगरपरिषद निवडणुकीत मतदार बांधवांनी दिलेला कौल लक्षात घेता, विशेषतः भाजपाच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर मते पडल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. यापुढे प्रत्येक प्रभागात प्रतिनगरसेवक तेवढ्याच ताकदीने, चिकाटीने व प्रामाणिकपणे काम करून नागरिकांना मूलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील, असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.प्रभागनिहाय प्रतिनगरसेवकांची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार असून, महाराष्ट्रात चाळीसगाव शहरातून लोकशाहीला पूरक असा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून एक आदर्श निर्माण करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
या बैठकीस घृष्णेश्वर पाटील, महेंद्र पाटील, चंद्रकांत तायडे, संजय चौधरी, दिलीप घोरपडे, भूषण ब्राम्हणकार, अमोल नानकर, नितीन देशमुख, आनंदा पवार सर, दुर्गेश जाधव, प्रशांत पाटील, सचिन आव्हाड, योगेश राजधर पाटील, सागर मधुकर पाटील, सौरभ पाटील, गोपाल भालेराव, बबनभाऊ पवार, लेवेश राजपूत, चिरागद्दीन शेख, गणेश महाले, काशिनाथ गायकवाड आदी सदस्य उपस्थित होते.
