अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
९ तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाद्वारे शेकडो रुग्णांची तपासणी व मोफत औषधोपचार
चाळीसगाव(प्रतिनिधी)- हजरत पीर सैयद मूसा कादरी अलैहिर्रहमा यांच्या उरूस मुबारकाच्या पवित्र निमित्ताने चाळीसगाव येथे भव्य मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रजाये इलाही या नेक उद्देशाने आयोजित या शिबिरात ९ नामवंत व अनुभवी डॉक्टरांच्या तज्ज्ञ पथकाद्वारे रुग्णांची सेवा केली जाणार असून, शेकडो रुग्णांची मोफत तपासणी व औषधोपचार करण्यात येणार आहेत.
वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या हजरत आमना ट्रस्ट, मालेगाव यांच्या प्रेरणेने चाळीसगाव येथील आला हजरत एज्युकेशन अँड वेल्फेअर फाउंडेशन (नोंदणीकृत) यांच्या वतीने या वैद्यकीय सेवांचा शुभारंभ करण्यात येत आहे. फाउंडेशनशी संलग्न सुजाण व शिक्षित तरुणांनी मुफ्ती सैयद मुहम्मद अहमद कादरी यांच्या नेतृत्वाखाली गरीब व गरजू रुग्णांना मोफत औषधे उपलब्ध करून देण्याचा सामाजिक संकल्प केला आहे.
याच अनुषंगाने हजरत पीर मूसा कादरी अलैहिर्रहमा यांच्या नावाने ओपीडी सेंटरची स्थापना करण्यात येत असून, या केंद्रामार्फत नियमितपणे रुग्णांना मोफत औषधोपचार दिले जाणार आहेत. या ओपीडी सेंटरचा उद्घाटन समारंभ रविवार, दिनांक ११ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.
या उद्घाटन प्रसंगी आयोजित वैद्यकीय शिबिरात पुढील डॉक्टर आपली सेवा देणार आहेत –
डॉ. हमीद इक्बाल (MBBS, DCH)
डॉ. मुबश्शिर जमील (MBBS, DCH)
डॉ. वसीम अहमद (MBBS, MS – ऑर्थो)
डॉ. शादाब खान (MD, Medicine – ISM)
डॉ. शमीला आफरीन (MBBS, DDB)
डॉ. हसीबुर्रहमान (MBBS, DCH)
डॉ. अशहर इफ्तिखार (MBBS)
डॉ. फरजाना खान (BHMS)
डॉ. शेख फहीम अहमद (BAMS, DYA)
हे वैद्यकीय शिबिर तहजीब शाळा,हजरत अली चौक जवळ चाळीसगाव येथे आयोजित करण्यात आले असून, उद्घाटन समारंभ सकाळी १० वाजता होणार आहे. या कार्यक्रमास चाळीसगाव शहरातील मान्यवर धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी होप्स इंडिया, मुंबईचे संस्थापक हाजी रिहान अन्वर धोराजीवाला, तसेच शुएब अहमद रजवी (बसनी, राजस्थान), हजरत आमना ट्रस्टचे सदस्य हाजी गुलाम सरवर, हबीबुर्रहमान सेठ, इम्तियाज खुर्शीद, कारी मुहम्मद युसूफ व गुलाम फरीद हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
फाउंडेशनच्या सदस्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिबिराच्या तयारीला वेग आला असून पोस्टर्स, बॅनर्स तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून या शिबिराची माहिती मोठ्या प्रमाणावर जनतेपर्यंत पोहोचवली जात आहे. नामवंत डॉक्टरांच्या सहभागामुळे चाळीसगावसह परिसरातील ग्रामीण व दुर्गम भागातील रुग्ण मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घेतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, रविवार रोजीच सायंकाळी असर नमाजनंतर चोपडा येथे ताजुश्शरिया फाउंडेशनच्या वतीने तसेच इशा नमाजनंतर अमळनेर येथे अल-खिदमत ट्रस्ट (नोंदणीकृत) यांच्या वतीने ओपीडी सेंटर्सचे उद्घाटन हाजी रिहान अन्वर धोराजीवाला यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे, मागील महिन्यात हजरत आमना ट्रस्ट, मालेगाव आणि होप्स इंडिया, मुंबई यांच्या संयुक्त शिष्टमंडळाने खानदेश परिसराचा दौरा करून वैद्यकीय सेवांचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला होता. त्याअंतर्गत धरणगाव, यावल, कासोदा व साऊदा येथे विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मोफत ओपीडी सेंटर्स सुरू करण्यात आले आहेत.याच मालिकेत आता रविवार, दिनांक ११ जानेवारी रोजी चाळीसगाव, धरणगाव व चोपडा या तीन शहरांमध्ये एकाच दिवशी ओपीडी सेवा सुरू होणार असून, हा उपक्रम सामाजिक आरोग्य सेवेसाठी मैलाचा दगड ठरणार आहे.
