अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
जळगाव (प्रतिनिधी)- शहरातील रिलायन्स पेट्रोलपंपसमोरील टी.एम. नगर परिसरात नव्याने बांधकाम सुरू असलेल्या घरात झालेल्या घरफोडी प्रकरणाचा एमआयडीसी पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणात एक आरोपी अटकेत असून त्याचा एक साथीदार विधिसंघर्षित बालक असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दि. 28 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6.00 वाजेपासून ते दि. 29 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9.30 वाजेच्या दरम्यान सर्वे नं. 511 ते 514 येथील लाईट फिटिंग व नळफिटिंगचे काम सुरू असलेल्या घराचा कडी-कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी नळफिटिंग व लाईट फिटिंगचे साहित्य चोरून नेले होते. याप्रकरणी फिर्यादी यांनी दि. 7 जानेवारी 2026 रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा र. नं. 25/2026 भारतीय न्याय संहिता कलम 305(अ), 331(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या आदेशानुसार पोउपनिर राहुल तायडे, पोउपनिरि चंद्रकांत धनके, सफौ विजयसिंग पाटील, पोहेकॉ रमेश चौधरी, पोकॉ गणेश ठाकरे, पोकॉ नितीन ठाकुर, पोकॉ राहुल घेटे, पोकॉ/ किरण पाटील, अशांची टिम तयार करुन गुन्हे शोध पथक गठीत करण्यात आले. पथकाने घटनास्थळासह जळगाव शहरातील विविध भागांतील सीसीटीव्ही फुटेज तपासले. नेत्रम विभागातील पोकॉ पंकज खडसे, पोकॉ कुंदनसिंग बयस, पोकॉ मुबारख देशमुख या कर्मचाऱ्यांच्या मदतीने फुटेजची सखोल पाहणी व बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात आला.
या कारवाईत सैय्यद उबेद सैय्यद रफीक पटवे (वय 19, रा. मास्टर कॉलनी, जळगाव) यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याचा एक साथीदार विधिसंघर्षित बालक असल्याचे स्पष्ट झाले. आरोपीकडून सुमारे ₹28 हजार किमतीचे नळफिटिंग व लाईट फिटिंगचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास सफौ विजय सिंह पाटील व पो.कॉ. निलेश पाटील करीत आहेत.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे तसेच पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
