अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई पदासाठीच्या भरती प्रक्रियेला दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी पोलीस मुख्यालय, जळगाव येथे अत्यंत शिस्तबद्ध व पारदर्शक वातावरणात सुरुवात झाली. भरती प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने उमेदवारांनी सहभाग नोंदवला.
पहिल्या दिवशी एकूण ५०० उमेदवारांना शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीसाठी बोलावण्यात आले होते. त्यापैकी ३४० उमेदवार प्रत्यक्ष उपस्थित राहिले. यामध्ये ४१ उमेदवार शारीरिक मोजमापात अपात्र ठरले, तर १७९ उमेदवार मैदानी चाचणीत अपात्र ठरले आहेत. विहित निकषांनुसार झालेल्या चाचण्यांनंतर १२० उमेदवार मैदानी चाचणीत पात्र ठरले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
संपूर्ण भरती प्रक्रिया ही पूर्णपणे गुणवत्तेवर (Merit) आधारित असून, पारदर्शकता राखण्यासाठी आणि मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. मैदानावर सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली सर्व चाचण्या पार पडत आहेत.
याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी उमेदवार व त्यांच्या पालकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. काही समाजकंटक किंवा दलाल “पोलीस भरतीत निवड करून देतो” असे खोटे आश्वासन देत पैशांची मागणी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा कोणत्याही भुलथापा किंवा आमिषांना बळी पडू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. पोलीस भरतीसाठी पैसे देणे किंवा घेणे हा कायद्याने गुन्हा आहे, असेही त्यांनी नमूद केले.
जर कोणत्याही व्यक्तीने भरती करून देण्याच्या बहाण्याने पैशांची मागणी केली किंवा फसवणूक करण्याचा प्रयत्न केला, तर संबंधितांनी तात्काळ पोलीस अधीक्षक कार्यालय अथवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार नोंदवावी. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
ही भरती प्रक्रिया केवळ कष्ट व गुणवत्तेच्या जोरावरच पार पडणार असल्याने उमेदवारांनी अफवांवर विश्वास न ठेवता आत्मविश्वासाने प्रक्रियेला सामोरे जावे, असे आवाहन जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.
