अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
जळगाव(प्रतिनिधी)- धावत्या रेल्वेमधून प्रवाशांची बॅग चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले असून त्याचा साथीदार फरार आहे.
दिनांक ०८ फेब्रुवारी २०२६ रोजी आनंद मोर्या (रा. अयोध्या) हे झेलम एक्सप्रेसने प्रवास करीत असताना जळगाव ते भुसावळ दरम्यान धावत्या रेल्वेमधून अज्ञात इसमाने त्यांची बॅग चोरी केली होती. सदर बॅगेत सुमारे १ लाख ६५ हजार रुपये किमतीचे सोने व चांदीचे दागिने होते. या प्रकरणी फिर्यादी आनंद मोर्या यांनी इटारसी रेल्वे पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने तक्रार दाखल केली होती. पुढील तपासासाठी ही तक्रार भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली होती.
गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर चोरी जळगाव येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार १) समीर शेख फिरोज उर्फ गोल्डन (रा. फातेमा नगर, अल्फरा मशिदीजवळ, जळगाव) व २) सोनू जयसिंग बागडे (रा. जाखनी नगर, कंजरवाडा, जळगाव) यांनी केल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड यांना मिळाली.
त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली अधिनस्त अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत फातेमा नगर, जळगाव येथून समीर शेख फिरोज उर्फ गोल्डन (वय २१) यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने सदर चोरीचा गुन्हा आपल्या साथीदारासह केल्याची कबुली दिली. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यास भुसावळ रेल्वे पोलीस स्टेशनच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आले असून त्याचा दुसरा साथीदार सोनू बागडे याचा शोध सुरू आहे.
ही कारवाई मा. डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगाव, मा. श्री. अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक जळगाव तसेच श्री. राहुल गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक शरद बागल तसेच पोलीस अंमलदार अतुल वंजारी, अकरम शेख, विजय पाटील, नितीन बाविस्कर, किशोर पाटील व रविंद्र कापडणे यांचा सहभाग होता.
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
