अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव(प्रतिनिधी)-दि. ८ फेब्रुवारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक अडचणी तसेच पर्याय निवडीत झालेल्या त्रुटींमुळे काही पात्र महिला लाभापासून वंचित राहिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पुन्हा एकदा ई-केवायसी करून माहिती दुरुस्त करण्याची संधी उपलब्ध करून दिली असून, यासाठी ३१ मार्च २०२६ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला ठोस व स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच, ज्यांची ई-केवायसी प्रक्रियेत चूक झाली आहे किंवा ज्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशा सर्व लाडक्या बहिणींनी ३१ मार्च २०२६ पूर्वी जवळच्या सेवा केंद्रावर जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. कोणतीही अडचण आल्यास थेट संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. शासन व प्रशासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असेही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले.
याबाबत पालकमंत्री पाटील यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, महिला व बालकल्याण विभागाचे श्री. तडवी तसेच संबंधित सर्व विभागांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की, पात्र असलेली एकही लाडकी बहीण लाभापासून वंचित राहणार नाही, याची वैयक्तिक जबाबदारी संबंधित यंत्रणेने घ्यावी. आवश्यक यंत्रणा राबवून प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी व प्रत्येक प्रकरणाचा संवेदनशीलतेने आणि तत्परतेने पाठपुरावा करावा, असेही त्यांनी सांगितले.
तसेच, लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी प्रक्रिया राबवणाऱ्या सेवा केंद्र चालक, सीएससी केंद्र तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नम्र पण ठाम शब्दांत आवाहन केले आहे की, ई-केवायसी करताना पात्र/अपात्र पर्याय निवडताना अत्यंत काळजी घ्यावी. लाडक्या बहिणींची कोणतीही चूक होणार नाही, याची पूर्ण खबरदारी घ्यावी. हे काम माता-भगिनींचे आशीर्वाद घेण्याच्या भावनेने करावे. त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधान हेच आपले खरे समाधान मानून काम करावे, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.
