अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील तम्मव्हाण येथून जवळ असलेल्या तळेगाव गावात मागील १२ ते १५ दिवसांपासून पाणीपुरवठा पूर्णतः ठप्प झाल्याने ग्रामस्थांचे हाल झाले आहेत. गावाला दोन स्वतंत्र पाणीपुरवठा योजना असताना—एक मन्याड धरणावरून व दुसरी उमळवर धरणावरून—दोन्ही धरणे शंभर टक्के भरलेली असूनही गावात पाणी येत नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी आज दि. ७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला.
गेल्या सुमारे २५ दिवसांपासून पाणीपुरवठा अनियमित असून मागील पंधरवड्यापासून तर नळाला पाणीच येत नसल्याने महिलांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर गावातील ४० ते ५० महिलांनी एकत्र येत ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा नेऊन तीव्र संताप व्यक्त केला.
मोर्चादरम्यान महिलांनी “पाणी असूनही पाणी नाही” अशी भावना व्यक्त करत प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत जाब विचारला. यावेळी सरपंच रुपाली रविंद्र मोरे व माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी मोर्चास्थळी भेट देत येत्या दोन दिवसांत पाईपलाईनमधील लिकेज काढून गावाला सुरळीत पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर महिलांनी हंडा मोर्चा तात्पुरता स्थगित केला.
या मोर्चात सौ. आशाताई होनमाने, स्मिता शिंदे, सुनिता सुळ, अर्चना सुळ, रत्नाबाई वाघमोडे, रत्नाबाई नायकुडे, छायाबाई खरात, अनिता शेजाळ, अलकाबाई मेटकर, कुसुमबाई कासार, शीतल शेलार, कावेरी देशमुख, कार्तिका सुळ, कल्पना भोसले यांच्यासह चेतन देशमुख, महेश शिंदे, बी. के. देशमुख, पोपट तांबे, राजेश होनमाने आदींसह असंख्य महिला व नागरिक उपस्थित होते.
जुनी योजना व पाईपलाईन फुटीचा फटका
तळेगाव येथील उमळवर धरणावरील पाणीपुरवठा योजना सुमारे ४५ वर्षे जुनी आहे. तर मन्याड धरणावरून येणारी पाणीपुरवठा योजना काकळणे गावावरून जात असल्याने तेथे सुरू असलेल्या ऊसतोडीमुळे व ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकांमुळे पाईपलाईन वारंवार फुटत आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यात अडचण निर्माण झाली होती. सदर पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू असून दोन दिवसांत गावात सुरळीत पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल, अशी माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी दिली.
