अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
चाळीसगाव(प्रतिनिधी)-शहरातील शास्त्रीनगर परिसरात भरदिवसा कुटुंब बाहेरगावी असताना अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे ९८ हजार ९८३ रुपयांचा सोन्याचा ऐवज व रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, विनोद रघुनाथ अमृतकार (वय ४२, व्यवसाय डॉक्टर) रा. शास्त्रीनगर, खरजई नाका, चाळीसगाव हे आपल्या कुटुंबासह ९ फेब्रुवारी रोजी सकाळी पाचोरा येथे नातेवाईकांकडे गेले होते. त्यांचा नागद (ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) येथे ‘वेदांत क्लिनिक’ नावाने दवाखाना आहे. घराच्या सुरक्षेसाठी त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून त्याचे चित्रीकरण मोबाईलवर पाहण्याची सुविधा आहे.दि. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी त्यांच्या पत्नीने मोबाईलवर सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, पहाटे १.४३ ते २.०८ या वेळेत तोंडाला कापड बांधलेल्या अज्ञात इसमांनी मुख्य दरवाज्याचे लॉक तोडून घरात प्रवेश केल्याचे आणि काही वेळानंतर बाहेर पडल्याचे दिसून आले. तत्काळ शेजाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यांनी जाऊन पाहणी केली असता घराचा दरवाजा उघडा असल्याचे आढळले. यानंतर अमृतकार कुटुंब तातडीने चाळीसगावला परतले.
घरात प्रवेश केल्यावर बेडरूममधील लाकडी कपाट उघडलेले असून सर्व साहित्य अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेले दिसले. कपाटातील लॉकरमधून सुमारे १८.७५० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, २.८४० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या कानातील रिंग, ११ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या तसेच १० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ९८ हजार ९८३ रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला आहे. परिसरातील इतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून संशयितांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
