अधिकार आमचा न्युज नेटवर्क
दौंड प्रतिनिधी लखन शिंदे
दौंड(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध योजनांतील सवलतधारक किंवा योजनेअंतर्गत प्रवासाचा लाभ घेण्यासाठी यापुढे ‘स्मार्ट कार्ड’ बंधनकारक करण्यात येणार आहे.एसटी महामंडळाने व्यवहारात पारदर्शकता यावी आणि प्रवाशांना सुलभ सेवा मिळावी म्हणून ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (एनसीएमसी) या डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीचा अवलंब करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे
एसटी महामंडळांतर्गत महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना ५० टक्के सवलत, ६५ ते ७५ वयोगटातील प्रवाशांसाठी ५० टक्के सवलत, ७५ वर्षांपेक्षा पुढील ज्येष्ठांसाठी अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत विनाशुल्क प्रवास, शालेय विद्यार्थ्यांसाठी ६६.६७ टक्के दरात मासिक पास योजना, बारावीपर्यंत मुलींना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत मोफत पास, शाळा-महाविद्यालयांमध्ये थेट पास वितरण, स्वातंत्र्य सैनिक आणि एक साथीदार, मोफत प्रवास, मासिक, त्रैमासिक पासधारकांना ५० टक्के सवलत, त्याचा लाभ घेऊ इच्छिणारे प्रवासी यांना सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी एनसीएमसी कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे.
परंपरागत प्रवासी व्यवस्थेला डिजिटल स्पर्श देणारा हा टप्पा आहे. तिकिटासाठी सुट्या पैशांची कमतरता, पैशांची टंचाई किंवा या गोष्टी एनसीएमसी कार्डमुळे इतिहासजमा होतील. आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता निर्माण होणार असून प्रवाशांना सुलभ, सुरक्षित प्रवास करता येणार आहे. या योजनेचा लाभ सर्व सवलतधारी प्रवाशांनी घ्यावा असे आवाहन शिवाजी कानडे, आगार व्यवस्थापक दौंड यांनी केले यावेळी, स्थानक प्रमुख प्रतीक अनाके, वाहतुक नियंत्रक गणेश शेलार, ईबीक्स इंजीनीयर गणेश गायकवाड, तिगोटे दत्तात्रय, मुनीर शेख, अविनाश पाळेकर व प्रवाशी बांधव उपस्थित होते.
