Oplus_16908288
अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी): हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, पराक्रम, शौर्य आणि दूरदृष्टीचे प्रतीक असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त चाळीसगाव रेल्वे स्टेशन परिसरात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात शिवजयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. चाळीसगाव रेल्वे प्रबंधक एन. पी. बडगुजर साहेब तसेच मुख्य तिकीट निरीक्षक ए. सी. ढिवरे यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व रेल्वे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी महाराजांना मानवंदना देत “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणा दिल्या.
प्रबंधक बडगुजर यांनी आपल्या मनोगतात छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, त्यांचे सुशासन, शिस्तबद्ध प्रशासन आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी यांचा उल्लेख केला. महाराजांनी उभारलेले स्वराज्य हे केवळ राज्यकारभार नव्हते, तर ते लोककल्याणाचा आदर्श नमुना होते, असे त्यांनी सांगितले. आजच्या काळातही महाराजांचे विचार आणि आदर्श प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी प्रेरणादायी असून कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि संघभावना या मूल्यांचे पालन करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुख्य तिकीट निरीक्षक ए. सी. ढिवरे यांनीही यावेळी बोलतांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथा आणि राष्ट्रप्रेमाची आठवण करून दिली. रेल्वे सेवेत कार्यरत असताना प्रवाशांची सेवा हीच खरी देशसेवा असल्याचे सांगत त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना जबाबदारीने कार्य करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास रेल्वे विभागातील विविध शाखांतील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडला. शेवटी उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांचा अंगीकार करून समाजसेवा व प्रामाणिक कर्तव्यपालनाचा संकल्प केला.
