अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी): सम्राट नगर परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाच्या डोक्यात दगड मारून दुखापत केल्याची घटना २० फेब्रुवारी रोजी रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी जखमी तरुणाच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सागर देशमुख हा सम्राट नगर, चाळीसगाव येथे कुटुंबासह वास्तव्यास असून हातमजुरी करून उदरनिर्वाह करतो. घटनेच्या दिवशी तो घरासमोर फिरत असताना त्याचा मित्र यश उर्फ बाळा सोमनाथ बडनेरे (रा. स्वयंवर मंगलकार्यालयसमोर, खरजई रोड, चाळीसगाव) हा तेथे आला. “कामावर का येत नाहीस?” या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी सोबत असलेला गणेश मराठे हा समजावण्याचा प्रयत्न करीत होता; मात्र यश बडनेरे खूप रागात असल्याचे सांगण्यात आले.
वाद वाढत गेल्याने यश उर्फ बाळा याने शिवीगाळ करत खाली पडलेला दगड उचलून फिर्यादीच्या कपाळाच्या वर डोक्यात मारला. या मारहाणीत फिर्यादी जखमी झाला व त्याच्या डोक्यातून रक्तस्राव सुरू झाला. “तुला पाहून घेईन” अशी धमकी देत आरोपी तेथून निघून गेला. आरडाओरड ऐकून फिर्यादीचे वडील अनिल देशमुख व आई चित्रा देशमुख यांनी मध्यस्थी केली.
जखमी तरुणास त्याचा भाऊ तुषार देशमुख व मित्र सोनू जाधव यांनी तात्काळ देवरे हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. उपचारानंतर प्रकृती स्थिर झाल्यावर २२ फेब्रुवारी रोजी फिर्यादीने चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता, 2023 अंतर्गत कलम 118(1), 115(2), 351(2) व 352 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली एसआय अजय मालचे करीत आहेत.
