Oplus_16908288
अधिकार आमचा न्युज नेटवर्क
नवी दिल्ली : सायबर फसवणूक आणि ऑनलाइन गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. भारतात लवकरच व्हॉट्सअप (WhatsApp) वापरण्याच्या पद्धतीत मोठा बदल होणार असून ‘सिम बाइंडिंग’ फीचर लागू केले जाणार आहे. या नव्या नियमानुसार, मोबाईलमध्ये नोंदणीकृत आणि सक्रिय सिम कार्ड प्रत्यक्षरीत्या उपलब्ध नसल्यास व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही.
सध्या एकदा व्हॉट्सअप रजिस्टर केल्यानंतर संबंधित सिम कार्ड फोनमध्ये नसले तरी वाय-फाय किंवा इतर इंटरनेटच्या माध्यमातून ॲप वापरता येते. मात्र, नव्या अपडेटनंतर ज्या फोनमध्ये नोंदणीकृत सिम कार्ड असेल, त्याच फोनमध्ये व्हॉट्सअप सुरू राहील. सिम कार्ड काढल्यास किंवा बदलल्यास ॲप आपोआप बंद होईल.
बीटा व्हर्जनमध्ये चाचणी सुरू
तंत्रज्ञानविषयक संकेतस्थळ WABetaInfo च्या अहवालानुसार, व्हॉट्सअपच्या अँड्रॉइड बीटा व्हर्जन 2.26.8.6 मध्ये या फीचरची चाचणी सुरू आहे. लवकरच हे अपडेट सर्व भारतीय वापरकर्त्यांसाठी लागू केले जाण्याची शक्यता आहे.
UPI ॲप्सप्रमाणे प्रणाली
सध्या Google Pay आणि PhonePe सारख्या UPI ॲप्समध्ये सिम बाइंडिंगची सुविधा आधीपासूनच वापरात आहे. त्याच धर्तीवर आता व्हॉट्सअपमध्येही ही प्रणाली लागू होणार आहे.
सायबर ठगांवर कारवाईचा भाग
दूरसंचार विभागाकडून (Department of Telecommunications) सायबर ठग आणि बनावट नंबरच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक वेळा गुन्हेगार एका सिमवर व्हॉट्सअप सक्रिय करून ते सिम नष्ट करतात किंवा दुसऱ्या फोनमध्ये वापरतात. सिम बाइंडिंग फीचरमुळे अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर मोठ्या प्रमाणात अंकुश बसण्याची अपेक्षा आहे.
नवीन नियम लागू झाल्यानंतर वापरकर्त्यांनी आपले नोंदणीकृत सिम कार्ड सक्रिय ठेवणे आवश्यक राहणार असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने हा बदल महत्त्वाचा मानला जात आहे.
