अधिकार आमचा न्युज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत चाळीसगाव-धुळे रोडवरील पुन्शी डांबरप्लांटसमोर झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संतोष इंदल पवार (वय 37, रा. चैतन्य तांडा नं. 4, करगाव ता. चाळीसगाव) यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा भाऊ अशोक इंदल पवार (वय 39) हा दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी सुमारे 9 वाजेच्या सुमारास शेतातील पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी हिरो कंपनीची स्प्लेंडर (क्र. MH 52 A 4981) ही मोटारसायकल घेऊन बिलाखेड शिवाराकडे जात होता.
सकाळी सुमारे 9.30 वाजता चाळीसगाव-धुळे महामार्गावरील पुन्शी डांबरप्लांटसमोर धुळे कडून येणाऱ्या मारुती कंपनीच्या व्हॅगनर (क्र. MH 15 BN 1451) या कारने मोटारसायकलला उजव्या बाजूस जोरदार धडक दिली. या धडकेत अशोक पवार रस्त्यावर कोसळले व त्यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना प्रथम चाळीसगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी धुळे येथील साई हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथील के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये रेफर केले. तेथे त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र उपचार सुरू असताना दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 12.55 वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून करगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
या प्रकरणी संबंधित मारुती व्हॅगनर कारच्या अज्ञात चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दि 27 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चाळीसगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत.
