अधिकार आमचा न्युज नेटवर्क
दौंड प्रतिनिधी हर्षल पाटोळे
दौंड(प्रतिनिधी)-राज्यात राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत विद्यार्थ्यांच्या आहारात पालेभाज्या व पूरक आहाराचे प्रमाण वाढविण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाने केली आहे. याबाबतचे निवेदन महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांच्या संचालकांना देण्यात आले आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी सांगितले की, सध्या इयत्ता पहिली ते पाचवीसाठी दररोज १०० ग्रॅम तर इयत्ता सहावी ते आठवीसाठी १५० ग्रॅम तांदूळ शिजविण्याचे नियोजन आहे. मात्र प्रत्यक्षात विद्यार्थी इतक्या प्रमाणात भात खात नाहीत, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. परिणामी अन्न वाया जाण्याची शक्यता वाढते.
त्यामुळे तांदळाचे प्रमाण निम्म्याने कमी करून त्या बदल्यात तांदळात समाविष्ट करण्यात येणाऱ्या पालेभाज्या व विविध कडधान्यांचे प्रमाण वाढवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पूरक आहारातही वाढ करण्यात यावी. यासाठी वेगळी आर्थिक तरतूद करण्याची आवश्यकता नसून, तांदळाचे प्रमाण कमी करून उपलब्ध निधीतच पोषणमूल्य वाढविणे शक्य असल्याचे कांबळे यांनी स्पष्ट केले.
योजनेला अधिक प्रभावी व विद्यार्थीकेंद्री बनविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणेमार्फत अंमलबजावणी करावी आणि “मध्यवर्ती स्वयंपाकगृह योजना” सुरू करावी, अशीही मागणी संघटनेने केली आहे.
या मागण्यांचे निवेदन राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, शिक्षण आयुक्त, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालक यांना पाठविण्यात आले आहे.
यावेळी संघटनेचे राज्य महासचिव विठ्ठल सावंत, राज्य प्रवक्ते व पुणे जिल्हाध्यक्ष विनोद चव्हाण, महिला आघाडीच्या नेत्या पोर्णिमा रणपिसे, सुषमा तरटे, सुजाता गायकवाड, सीमा थोरात, तसेच विविध तालुकाध्यक्षांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
