अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या मंगळसूत्रांची पोत चोरून नेल्याची घटना १ मार्च २०२६ रोजी उघडकीस आली आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सोनाली योगेश मांडोळे (वय ३५, व्यवसाय शेती, रा. खडकी ता. चाळीसगाव जि. जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्या पती योगेश कौतीक मांडोळे व दोन मुलांसह शेती व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात.
फिर्यादी सोनाली मांडोळे व त्यांची जेठाणी वृषाली रंजीत मांडोळे या १ मार्च रोजी दुपारी सुमारे २.४५ वाजता चाळीसगावहून खडकीकडे जाणाऱ्या बसने प्रवास करून घरी पोहोचल्या. घरी आल्यानंतर सोनाली यांच्या लक्षात आले की त्यांच्या गळ्यातील सुमारे ३ ग्रॅम वजनाचे, अंदाजे ३० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र तुटलेले असून त्याची सोन्याची पोत गायब आहे. त्यांनी घर परिसरात तसेच रस्त्यावर शोध घेतला, मात्र दागिना मिळून आला नाही.
त्यानंतर त्या चाळीसगाव बसस्थानकावर जाऊन शोध घेत असताना रत्ना प्रविणसिंग पवार (रा. करगाव, ता. चाळीसगाव, सध्या हनुमानवाडी, चाळीसगाव) यांची भेट झाली. पवार यांनीही सकाळी सुमारे ११.३० वाजता बसस्थानकावर त्यांच्या गळ्यातील सुमारे ४ ग्रॅम वजनाचे, अंदाजे ४० हजार रुपये किमतीचे (गुलाबी रंगाचे खडे असलेले) मंगळसूत्र चोरीस गेल्याचे सांगितले.
दोघींनी एकत्र शोध घेतला असता मंगळसूत्र मिळून न आल्याने बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने दोघींच्या गळ्यातील सोन्याच्या पोती चोरल्याची खात्री झाली. एकूण ७० हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.
