अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी)-हसनाबाद (ता. भोकरदन, जि. जालना) येथील गुरुमाऊली ट्रेडर्ससमोर उभी असलेली आयशर गाडी व त्यामधील लोखंडी सळई चोरी प्रकरणाचा उलगडा करण्यात हसनाबाद पोलिसांना चाळीसगाव शहर पोलिसांच्या सोबतीने यश आले असून, या प्रकरणी दोन आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून सुमारे 8 लाख 50 हजार रुपयांची लोखंडी सळई जप्त करण्यात आली आहे. मात्र, चोरीस गेलेली आयशर गाडी अद्याप सापडलेली नाही.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,स्वप्निल सत्यनारायण राठी (वय 36, रा. हसनाबाद) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हसनाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 74/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी पहाटे 1.30 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानासमोर उभी असलेली आयशर गाडी व त्यातील लोखंडी सळई चोरून नेली होती. या घटनेत आयशर गाडी व सळई असा एकूण 16 लाख 59 हजार 163 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता.या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला. तपासादरम्यान गुप्त बातमीदार, सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे जालना येथून सुरू झालेली शोधमोहीम चाळीसगाव शहरापर्यंत पोहचली.या तपासातून आरोपी नामे ताबेश रफिक शेख (वय 20, रा. मदीना मस्जिद, हुडको कॉलनी, घाट रोड, चाळीसगाव, जि. जळगाव) व समीर रज्जाक शेख (वय 32, रा. वडोद बाजार, ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या मालापैकी अंदाजे 8 लाख 50 हजार रुपयांची लोखंडी सळई जप्त केली आहे.या कारवाईत हसनाबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाहरी तायडे यांना चाळीसगाव शहर पोलिस ठाण्याचे पोकॉ आशुतोष सोनवणे, पोकॉ रविन्द्र बच्छे, पोकॉ राकेश महाजन यांचे सहकार्य लाभले तसेच गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी हसनाबाद पोलिस ठाण्याचे पोहेकॉ दुर्गेश राठोड, पोकॉ निलेश खराट, पोकॉ प्रकाश बोर्डे, पोकॉ दिपक सोनुने, पोकॉ नारायण चरावंडे, पोकॉ अविनाश मान्टे, पोकॉ राहुल भागीले यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ प्रशांत लोखंडे, पोकॉ धिरज भोसले तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोहेकॉ सागर बावस्कर यांनी सहभाग घेतला.
चोरीतील उर्वरित मुद्देमाल व आयशर गाडीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तपास सुरू असून,या गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपींकडून इतर साथीदारांची नावे तपासात समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
