अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
एरंडोल (प्रतिनिधी) : ताडे ता. एरंडोल येथे दिनांक ०३ मे २०२६ रोजी आयोजित हळदी समारंभादरम्यान एका युवकाकडे गावठी कट्टा (अग्निशस्त्र) असल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी कासोदा पोलिसांनी तत्काळ हालचाल करत संशयित युवकाला अटक करून त्याच्याकडून कट्टा व जिवंत काडतूस जप्त केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ताडे येथे झालेल्या हळदी कार्यक्रमासाठी बाहेरगावाहून पाहुणे आले होते. त्यामध्ये लखन प्रकाश वाघ (रा. परधाडे ता. पाचोरा) हाही उपस्थित होता. रात्री सुमारे ११:३० वाजता बँडवर नाचत असताना काही नागरिकांच्या निदर्शनास त्याच्या कमरेला गावठी कट्टा असल्याचे आले. उपस्थितांनी विचारणा करताच त्याने गर्दीचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.सदर बाब कासोदा पोलीस स्टेशनला कळताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला.
गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, लखन वाघ हा पुन्हा ताडे परिसरात गुन्हा करण्याच्या उद्देशाने कट्टा बाळगून फिरत आहे. या माहितीची खात्री करून सपोनि श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील व पथकाने सापळा रचून भातखेडे चौफुली येथे संशयितास ताब्यात घेतले.अंगझडतीदरम्यान त्याच्याकडून एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.
आरोपीला पुढील कारवाईसाठी कासोदा पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले असून त्याच्याविरुद्ध अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कासोदा पोलीस स्टेशनचे प्रभारी सपोनि श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, पोकॉ/ निलेश गायकवाड, पोकॉ/ योगेश पाटील, पोकॉ/ सोनू पाचुंदे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
