अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
जळगाव, दि. २० (प्रतिनिधी) – जळगाव बसस्थानक परिसरात जेष्ठ नागरिकाला शनिदोष काढण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर पोलिसांचे लक्ष असल्याचे स्पष्ट झाले असून या प्रकारातील गुन्हेगारांना वचक निर्माण झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. २० एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे २.३० वाजता फिर्यादी गजानन विठोबा सर्जेराव (वय ६५, रा. जिल्हा बँक कॉलनी, जळगाव) हे जळगाव बसस्थानकात असताना एक इसम त्यांच्याजवळ येऊन शेगाव बसबाबत विचारणा करत संभाषणात गुंतवले. त्यानंतर त्याच्या साथीदाराने हातचलाखीने खड्याचा रुद्राक्ष केल्याचा बनाव करून फिर्यादींना बसस्थानकाच्या कोपऱ्यात नेले. “तुमचा शनिदोष काढतो” असे सांगून भुलथापा देत त्यांच्या हातातील अंगठी व रोख रक्कम काढून आरोपी पसार झाले.
या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ११७/२०२६ भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३१८(४), ३(५) अन्वये दोन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ तपासाचे आदेश दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके तयार करून तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी नगरदेवळा (ता. पाचोरा) येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने कारवाई करत १) अल्ताफ हसन मदारी (वय ३२, रा. नगरदेवळा) व २) मोहसीन जब्बार मदारी (वय ३१, रा. चाळीसगाव) यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या तिसऱ्या साथीदार सद्दाम मदारीचा शोध सुरू आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित व उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
