अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी): शहरातील धुळे रोड परिसरात एका हॉटेल चालकावर जुन्या वादातून जीवघेणा हल्ला झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. या घटनेत प्रफुल बापुसाहेब देशमुख (वय 34) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर देवरे हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रफुल देशमुख हे धुळे रोडवरील “हॉटेल राणी पार्क” चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांचा हर्षल दिपक राठोड (रा. जुना मालेगाव रोड, चाळीसगाव) याच्याशी यापूर्वी किरकोळ वाद झाला होता. तसेच काही दिवसांपूर्वी आरोपीने पैशांची मागणी केली होती. मात्र पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपी रागात असल्याचे सांगण्यात आले.रविवारी रात्री सुमारे 12.40 वाजेच्या सुमारास प्रफुल देशमुख हे हॉटेल बंद करून उत्तम टॉवरसमोरील गेटजवळ वाहन लावत असताना एव्हिएटर स्कुटीवरून दोन जण तेथे आले. स्कुटीच्या मागे बसलेला हर्षल राठोड खाली उतरून जुन्या भांडणाचा राग काढत “तुला आज जिवंत सोडत नाही” अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने कमरेतून धारदार शस्त्र काढून प्रफुल देशमुख यांच्या उजव्या दंडावर, खांद्यावर, पाठीच्या डाव्या बाजूस तसेच डाव्या हाताच्या बोटांवर सपासप वार केले.हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रफुल देशमुख यांनी आरडाओरड केल्यानंतर त्यांचे भाऊ दिनेश देशमुख व त्यांचा मित्र स्वप्निल कोतकर घटनास्थळी पोहोचले. त्यांना पाहून आरोपी व त्याचा साथीदार स्कुटीवरून पसार झाले.
जखमी अवस्थेत प्रफुल देशमुख यांना तत्काळ देवरे हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले.या प्रकरणी हर्षल दिपक राठोड व त्याच्या एका अनोळखी साथीदाराविरुद्ध जीवघेणा हल्ला, शिवीगाळ व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असुन पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.
