अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
जळगाव(प्रतिनिधी)- एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने धडक कारवाई करत मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून विविध कंपन्यांच्या एकूण १ लाख ८७ हजार रुपये किमतीच्या चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
याबाबत माहिती अशी की, दि. १७ मे २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास फिर्यादी संतोष रणछोड सैंदाणे (वय ४७, रा. वाघ नगर, जळगाव) यांची होंडा शाईन मोटारसायकल क्रमांक MH 19 CL 7558 ही सिंधी कॉलनी रोडवरील समर्थ हॉस्पिटलसमोरून अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याप्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४३३/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तात्काळ पथक स्थापन करून चोरीस गेलेली मोटारसायकल हस्तगत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. पथकाने घटनास्थळासह शहरातील विविध भागांतील सीसीटीव्ही फुटेज ‘नेत्रम’ कार्यालयातील पोकॉ मुबारक देशमुख यांच्या मदतीने तपासले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यात आला.तपासादरम्यान महेंद्र गोपाल चव्हाण (वय २३, रा. खोटे नगर, जळगाव) आणि मुकेश ताराचंद चव्हाण (वय २६, रा. पिंप्राळा हुडको, जळगाव) यांना ताब्यात घेण्यात आले. कौशल्यपूर्ण चौकशीत त्यांनी मोटारसायकल चोरीची कबुली दिली.
आरोपींकडून खालील मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत :
५० हजार रुपये किमतीची होंडा शाईन (MH 19 CL 7558)
५२ हजार रुपये किमतीची टीव्हीएस वेगो मोपेड (MH 19 CA 5949)
५० हजार रुपये किमतीची हिरो डिलक्स (MH 18 AK 0235)
३५ हजार रुपये किमतीची बजाज पल्सर (MH 19 ER 5456)
एकूण १ लाख ८७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गुणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पोहेकॉ किरण चौधरी, गणेश ठाकरे, रमाकांत साळुंखे, शशिकांत मराठे, किरण पाटील, योगेश घुगे तसेच ‘नेत्रम’ येथील पोकॉ मुबारक देशमुख यांनी ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.
