अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)-गेल्या काही दिवसांपासून चाळीसगाव शहरासह संपूर्ण तालुक्यात पेट्रोल आणि डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून याचा सर्वाधिक फटका शेतकरी वर्गाला बसत आहे. पेरणी, नांगरणी आणि शेती मशागतीच्या अत्यंत महत्त्वाच्या कालावधीतच इंधन टंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. इंधन मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रभर पेट्रोल पंपांवर थांबावे लागत असून अनेक ठिकाणी पेट्रोल पंप चालक आणि शेतकरी यांच्यात वाद-विवादाचे प्रसंगही घडत आहेत.

त्यातच शासनाकडून इंधन दरात वारंवार वाढ करण्यात आल्याने महागाईचा अतिरिक्त बोजा शेतकऱ्यांवर पडत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या सर्व परिस्थितीत शेतकरी अक्षरशः होरपळून निघत असून तो आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या रडकुंडीला आल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
शेतकऱ्यांना तातडीने सुरळीत इंधन पुरवठा करण्यात यावा तसेच शेती मशागतीची कामे अडथळ्याविना सुरू राहावीत, यासाठी शासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने नागद रोडवरील पेट्रोल पंपावर अनोखे आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक निषेध म्हणून “मेलडी चॉकलेट” वाटप केले.
देशाचे पंतप्रधान परदेश दौऱ्यावर इटलीच्या पंतप्रधानांना “मेलडी” चॉकलेट देत असताना देशातील शेतकरी मात्र इंधनासाठी त्रस्त असून त्यांची अवस्था दयनीय झाली आहे, असा आरोप करत या माध्यमातून शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. यासंदर्भातील निवेदन तहसीलदार प्रशांत पाटील यांना देण्यात आले.
या आंदोलनात शिवसेना तालुकाप्रमुख रमेश आबा चव्हाण, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, माजी नगरसेवक नंदकिशोर बाविस्कर, तालुका संघटक सुनील गायकवाड, महेंद्र जयस्वाल, उपशहर प्रमुख शैलेंद्र सातपुते, सुधाकर मोरे, मोहिनी मगर, रामेश्वर चौधरी, सुनील घोरपडे, आबा पाटील, दिलीप राठोड, दिलीप पाटील, विनायक मांडोळे, जगदीश महाजन, प्रभाकर ओगले, सुभाष राठोड, नाना ठाकरे, बद्री चव्हाण, लक्ष्मण चव्हाण, जावेद भाई, राजेंद्र डोके, श्रावण पांचाळ, लक्ष्मण बोराडे, नंदू गायकवाड, संदीप पाटील, गोविंद गवळी, संदीप ठुबे, नाना शिंदे, सुनील मराठे, ऋषिकेश गायकवाड, विलास भोई, गुड्डू पिंजारी, अनिल पाचंगे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
