अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- वंचित बहुजन आघाडी चाळीसगाव तालुक्याच्या वतीने अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरण रद्द करून मूळ घटनात्मक आरक्षण व्यवस्था अबाधित ठेवण्यात यावी, या मागणीसाठी तहसीलदार प्रशांत पाटील चाळीसगाव यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी निवेदनात म्हटले आहे की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय जातव्यवस्थेचे वर्णन “श्रेणीबद्ध विषमता” असे केले होते. जातव्यवस्था ही समाजात प्रत्येक स्तरावर विभाजन निर्माण करून परस्पर संघर्ष निर्माण करणारी रचना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. अशा परिस्थितीत अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याच्या प्रयत्नातून सामाजिक विषमतेला नव्या स्वरूपात संस्थात्मक करण्याचा गंभीर धोका निर्माण होत असल्याची भूमिका वंचित बहुजन आघाडीने मांडली.
आरक्षण ही केवळ सवलत नसून सामाजिक न्याय आणि संविधानिक हक्क असल्याचे सांगत, मूळ घटनात्मक आरक्षण व्यवस्थेला कोणत्याही प्रकारे धक्का लागू नये, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच अनुसूचित जातींमध्ये फूट पाडणारे उपवर्गीकरण तात्काळ रद्द करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संदीप भाऊ आण्णा कांबळे, महासचिव हंसराज भाऊ पगारे, उपाध्यक्ष चेतन पवार, कोषाध्यक्ष आशितोष परदेशी, संदीप केदार, विकास भाऊ बागुल, पंकज पाटील, धर्मराज पगारे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
