अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)-राज्याचे जलसंपदा मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते मा. ना. श्री. गिरीशभाऊ महाजन यांचे कृत्रिम बुद्धिमत्ता (A.I.) तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेले मॉर्फ व बनावट फोटो सोशल मीडियावर प्रसारित करून बदनामी केली जात असल्याचा आरोप करत संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी भाजपच्या चाळीसगाव तालुक्यातील पदाधिकारी,नगरसेवक व कार्यकर्त्यांनी केली आहे.
याबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक संदीप घुले यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन दिवसांपासून व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि एक्स (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काही समाजकंटकांकडून गिरीशभाऊ महाजन यांचे एआय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तयार केलेले बनावट व दिशाभूल करणारे फोटो प्रसारित केले जात आहेत. एका जबाबदार लोकप्रतिनिधी व राज्य मंत्र्याची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने हे कृत्य करण्यात आले असून त्यामागे राजकीय हेतू असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून बनावट फोटो तयार करणारे, प्रसारित करणारे तसेच अशा पोस्टला लाईक, शेअर अथवा पुढे पाठविणाऱ्या संबंधित व्यक्तींवर माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) व सायबर गुन्हे प्रतिबंधक कायद्यांतर्गत तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी भाजपचे पदाधिकारी नितीन पाटील, हर्षल चौधरी(नगरसेवक),प्रशांत कुमावत(नगरसेवक)
रामचंद्र जाधव(स्वीकृत नगरसेवक),योगेश खंडेलवाल(नगरसेवक),प्रभाकर चौधरी(माजी नगरसेवक), अनिल ठाकरे(नगरसेवक),संभा आप्पा जाधव(नगरसेवक),मोहित बजाज(स्वीकृत नगरसेवक), वसीम शेख(नगरसेवक),अभय वाघ(नगरसेवक), धर्मराज बच्छे(नगरसेवक)बाळासाहेब पवार, मुकेश चौधरी, योगेश गव्हाणे, प्रवीण मराठे, धनंजय पाटील, मनोज चौधरी, दीपक घुले,जयेश कारडा, राम पाटील, डॉ. प्रशांत एरंडे, योगेश ब्राम्हणकर, अजय वाणी, अमोल चौधरी, स्वप्निल मोरे व बंडू पगार उपस्थित होते.
भाजप पदाधिकारी नगरसेवक व कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाचा गैरवापर करून कोणाचीही बदनामी करण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी तातडीने आणि प्रभावी कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
