अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव तालुक्यातील १० पैलवानांना शिवनेरी फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्रातील नामांकित आखाड्यांमध्ये विशेष कुस्ती प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले आहे. आतापर्यंत फाउंडेशनकडून या पैलवानांना सुमारे ११ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे.
या पैलवानांनी आपल्या कुस्ती कौशल्याच्या जोरावर राज्यभरात नावलौकिक मिळवला आहे. यामधील वाकडी येथील रोहित अनिल मोरे हा चांदवड येथील जीवन संकुल अकॅडमीत प्रशिक्षण घेत असून, नुकत्याच पार पडलेल्या नाशिक जिल्ह्यातील प्रतिष्ठित कोचरगाव केसरी कुस्ती स्पर्धेत त्याने मानाची गदा जिंकून आपल्या नावे केली आहे.
या यशानंतर रोहित मोरेने काल चाळीसगाव येथील जनसंपर्क कार्यालयात आमदार मंगेश चव्हाण यांची सदिच्छा भेट घेतली. आमदार चव्हाण यांनी त्याचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
शिवनेरी फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील कुस्तीपटूंना नवसंजीवनी मिळत असून, त्यातून महाराष्ट्राला भविष्यात राष्ट्रीय पातळीवर चमकणारे पैलवान मिळण्याची आशा व्यक्त होत आहे.
