अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) –विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने समाजात जागरूकता निर्माण व्हावी या हेतूने चाळीसगाव येथील आनंदीबाई बंकट हायस्कूलमध्ये विद्यार्थिनींसाठी विशेष संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले. या संवादासाठी चाळीसगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर, विविध सामाजिक संस्था व आरोग्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात शंकर मुटेकर यांनी विद्यार्थिनींशी हितगुज करताना गुड टच आणि बॅड टच यामधील फरक, सभोवतालच्या लोकांची ओळख, आत्मसुरक्षेची तंत्रे यासंदर्भात माहिती दिली. “मुलींनी स्वतःच्या सुरक्षेसाठी भक्कमपणे उभं राहावं आणि अन्यायाविरोधात निडरपणे आवाज उठवावा,” असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे चेअरमन अॅड. प्रदीप अहिरराव, मुख्याध्यापिका इंगळे मॅडम, डॉ. संदीप देशमुख (बापजी हॉस्पिटल), डॉ. विरजा देशमुख, सह्याद्री प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष दिलीप घोरपडे व जिल्हाध्यक्ष अॅड. रणजीत पाटील आदी उपस्थित होते.
डॉ. विरजा देशमुख यांनी विद्यार्थिनींसोबत संवाद साधून वाढत्या वयातील शारीरिक व मानसिक बदलांवर मार्गदर्शन केले, तर डॉ. संदीप देशमुख यांनी सहज संवाद साधत विद्यार्थिनींना खुलं बोलायला प्रेरित केलं.
अॅड. रणजीत पाटील यांनी आपल्या भाषणात विद्यार्थिनींना आत्मविश्वासाने वागण्याचा सल्ला दिला. “समाजातील पोलीस व सामाजिक कार्यकर्ते तुमच्या सोबत आहेत,” असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सातपुते सर यांनी केले. पाचवी ते दहावीच्या सुमारे ११०० विद्यार्थिनींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या उपक्रमातून विद्यार्थिनींमध्ये जागरूकता निर्माण झाली असून, यापुढे त्या स्वतःची काळजी घेण्यास सक्षम ठरतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
