अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने विशेष कारवाई करत एक बनावट चोरीचा प्रकार उघडकीस आणला आहे. या प्रकरणात तिघांना ताब्यात घेऊन एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
दि. २४ जून २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळालेल्या माहितीवरून अशोक हिरामण मोरे (वय ३९, रा. दगडी मनवेल, ता. यावल) याच्याकडे असलेल्या चोरीच्या संशयित मोटारसायकलविषयी चौकशीचे आदेश दिले होते. पोलीस अंमलदार पोहेकॉ प्रितमकुमार पाटील, पोहेकॉ यशवंत टहाकळे,पोकॉ बबन पाटील व पोकॉ प्रदीप सपकाळे यांनी सदर व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता मोठा खुलासा झाला.
पोलिसांच्या चौकशीत अशोक मोरे याने सांगितले की, त्याने पाच वर्षांपूर्वी रावेर येथील जुने वाहन खरेदी विक्री एजंट जफर शेख उस्मान (वय ३४, रा. जाम मोहल्ला, भुसावळ) यांच्या माध्यमातून भुसावळ येथील प्रमोद निलेश कोळी (वय ३७, रा. हुडको कॉलनी, भुसावळ) याच्याकडून एक मोटारसायकल विकत घेतली होती. ही मोटारसायकल बजाज फायनान्सकडून घेतलेली असून तिचे हप्ते थकीत होते.यावरून प्रमोद कोळी याने मोटारसायकल चोरी झाली अशी बनावट तक्रार ३० डिसेंबर २०१९ रोजी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात दाखल केली होती (गु.क्र. २८५/२०१९ भादंवि कलम ३७९ नुसार).
पोलिसांच्या तपासात हे निष्पन्न झाले की, प्रमोद कोळी, जफर शेख व अशोक मोरे यांनी मिळून मोटारसायकल चोरीचा बनाव तयार केला होता. मोटारसायकलला बनावट नंबर प्लेट (MH 19/CC 6640) लावण्यात आलेली होती, तर खरी नोंदणी क्रमांक होता MH 19/DK 0755.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी मोटारसायकल जप्त करून तिन्ही आरोपींना भुसावळ शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.
या कारवाईमुळे वाहनचोरीसंबंधी बनावट तक्रारी देणाऱ्यांवर लगाम बसेल, अशी प्रतिक्रिया जिल्ह्यातून व्यक्त होत आहे.
