अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
जळगाव(प्रतिनिधी)- दि. २७ जून “जळगाव जिल्हा मोठा आहे, पण तुमच्या समस्या आमच्यासाठी जवळच्या आहेत!” या शब्दांत जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांनी जनतेशी थेट संवाद साधण्याचा अभिनव उपक्रम सुरु केला आहे.
जिल्ह्यातील दूरवरच्या भागांतील नागरिक वेळेअभावी किंवा अंतरामुळे थेट जिल्हा परिषदेच्या कार्यालयात येऊन तक्रारी नोंदवू शकत नाहीत, याची दखल घेत हा डिजिटल संवाद उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
“QR कोड स्कॅन करा, संवाद साधा!” या नावाने सुरू झालेल्या या उपक्रमात नागरिक दिलेल्या QR कोडद्वारे थेट जिल्हा परिषदेच्या सीईओ आणि विविध विभाग प्रमुखांशी संपर्क साधू शकतात.
या उपक्रमाअंतर्गत नागरिक खालील विषयांवर आपली मते, सूचना आणि तक्रारी सहज पाठवू शकतात:
✔️ शिक्षण
✔️ आरोग्य
✔️ रस्ते
✔️ पाणीपुरवठा
✔️ महिला व बालकल्याण
✔️ विकास योजनांचे अंमलबजावणी
दर सोमवार ते शुक्रवार सकाळी ११ ते दुपारी २ दरम्यान सीईओ व त्यांची टीम थेट संवादासाठी उपलब्ध असणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल यांनी सांगितले की, “प्रत्येक नागरिकाचा आवाज आम्हाला महत्त्वाचा आहे. आम्ही प्रत्येक सूचना नोंदवून अभ्यास करू व आवश्यक ती कारवाई सुनिश्चित करू.”
हा उपक्रम जिल्हा प्रशासन व जनतेतील संवाद अधिक पारदर्शक, सुलभ व सहभागी बनवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
