अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
पाचोरा( प्रतिनिधी)- शहरातील गजबजलेल्या बस स्थानक परिसरात शुक्रवारी, ४ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास थरारक घटना घडली. दोन अज्ञात व्यक्तींनी मोटरसायकलवरून येत गावठी कट्ट्याने एका २६ वर्षीय तरुणावर १२ राऊंड फायर केले. या गोळीबारात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मृत तरुणाचे नाव आकाश कैलास मोरे (वय २६, रा. छत्रपती शिवाजी नगर, पाचोरा) असे आहे. प्राथमिक माहितीनुसार, आकाश सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास बसस्थानकावर आपल्या नातेवाईकांना सोडण्यासाठी गेला होता. त्याच वेळी मोटरसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी अचानक त्याच्यावर गोळीबार सुरू केला. गावठी कट्ट्याने डोक्यावर, कपाळावर, पाठीवर, छातीवर एकूण १२ गोळ्या झाडण्यात आल्या. गोळ्यांचा मारा इतका भीषण होता की, आकाशचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
गोळीबारानंतर दोन्ही मारेकरी सुसाट वेगाने घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवत, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले होते.
या थरारक हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, ही घटना पूर्ववैमनस्यातून घडली असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
दरम्यान, या घटनेनंतर नागरिकांत भीतीचे व अस्वस्थतेचे वातावरण पसरले असून, पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक पचोऱ्यात दाखल….
गोळीबार मध्ये एका तरुणाची हत्या झाली असल्याची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी हे तत्काळ पाचोरा येथे घटना स्थळी दाखल झाले होते, पसार झालेल्या संशयित मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी 2 पथक तयार करण्यात आले असून पथक त्यांचा शोध घेण्यासाठी रवाना झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
