अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी): शहर वाहतूक शाखेच्यावतीने शहरातील सेंट जोसेफ स्कूल, पोद्दार स्कूल तसेच एच.एस.पटेल- पाटसकर स्कूल येथे भेट देत शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग तसेच शालेय वाहन चालक व खाजगी वाहन चालक यांच्यासोबत बैठक घेण्यात आली.
या बैठकीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी सर्व चालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे स्पष्टपणे सांगण्यात आले. शाळा प्रशासनाने परिवहन समिती अद्यावत ठेवावी व वेळोवेळी त्यांची बैठक आयोजित करावी, असे निर्देश मुख्याध्यापकांना देण्यात आले.
तसेच वाहन चालकांनी आवश्यक कागदपत्रे जसे की वैध ड्रायव्हिंग लायसन्स, गाडीचे आरसी बुक, इन्शुरन्स, पीयूसी, आरटीओकडून प्राप्त विद्यार्थी वाहतूक परवाना, चालकाची वैद्यकीय तपासणी आणि गाडीचा फिटनेस प्रमाणपत्र यांची खातरजमा करून सदैव सोबत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
वाहतूक शाखेने स्पष्ट केले की, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरोधात मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल. त्यामुळे सर्व वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सहकार्य करावे,असे आवाहन वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांनी केले.
यावेळी शाळेतील शिक्षक वर्ग,वाहन चालक तसेच वाहतूक शाखेचे कर्मचारी उपस्थित होते.
