अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – शहराजवळील रांजणगाव फाट्याजवळ आज दिनांक 12 जुलै सकाळी पाव विक्रीसाठी जात असलेल्या उत्तरप्रदेशातील मजुराचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला होता. परंतु तत्काळ केलेल्या पोलीस कारवाईत आरोपी वाहनासह ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती जावेद अन्वर खान (वय 36, रा. रुरा, ता. त्रिवा, जि. कनोज, उत्तरप्रदेश, सध्या राहणार विश्वास बेकरीजवळ, हिरापुर रोड, चाळीसगाव) हे त्यांच्या सहकाऱ्यासह पाव विक्रीसाठी सायकलवरून रांजणगाव गावाकडे जात होते. आज सकाळी सुमारे 6 वाजता, रांजणगाव फाटा फौजी ढाब्याजवळ पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या पांढऱ्या रंगाच्या टाटा विंगर गाडीने (क्रमांक MP 09 AH 9733) त्यांच्या सायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात जावेद खान रस्त्याच्या बाजूला फेकले गेले व त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी सकाळी 7.55 वाजता त्यांना मृत घोषित केले. घटनास्थळी माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी करून फरार झालेल्या गाडीचा पाठलाग केला. काही वेळातच ही विंगर गाडी ताब्यात घेण्यात आली असून गाडीचालकाचे नाव अक्षय सुभाष ससाने (रा. देवास नाका, बापू गांधी नगर, शिवमंदिर समोर, इंदोर, मध्यप्रदेश) असे आहे.
या घटनेबाबत मृताच्या सहकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून, चालकाने भरधाव वेगात गाडी चालवत असताना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे वाहन चालवले. त्यामुळे झालेल्या अपघातात जावेद खान यांचा मृत्यू झाला असून चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. उत्तरप्रदेशातील सुमारे 8 ते 10 पाव विक्रेते सध्या चाळीसगाव तालुक्यात विविध गावांमध्ये व्यवसाय करीत असून, मृत व्यक्ती त्यांच्यातील एक होता.पुढील तपास ग्रामीण पोलिस करत आहे.
