अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – शहरातील घाटरोड येथील सुभाष प्लाझा मधील स्क्रॅप दुकानात चोरट्यांनी चोरी करून सुमारे ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दुकान मालकाने चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी नासीर नबाब शेख (वय ४९), रा. ख्वाजा नगर, मदिना मशीद जवळ, हुडको, चाळीसगाव हे आपल्या साबीर स्क्रॅप दुकानमार्फत उदरनिर्वाह करतात. दिनांक ९ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७.३० वाजता नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते. मात्र, १० जुलै रोजी सकाळी ७ वाजता दुकान उघडण्यासाठी आल्यावर त्यांना दुकानाचे शटर अर्धवट उघडे व कुलूप तुटलेले दिसून आले.
त्यानंतर त्यांनी आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली, पण कोणतीही माहिती मिळाली नाही. दुकानात प्रवेश केल्यानंतर गल्ल्यातील ४०,००० रुपये रोख रक्कम व सुमारे ३० किलो केस अंदाजे ३०,००० रुपये असा एकूण ७०,००० रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ३०५,३३१(४) अन्वये शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून,परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.
