अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
कासोदा (ता. एरंडोल) : दि. २४ जुलै रोजी पारोळा टी पॉईंटजवळ शेतकरी कर्जमाफी, दिव्यांग, विधवा भगिनी, मेंढपाळ, ज्येष्ठ नागरिक, कामगार यांच्यासह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे करण्यात आलेल्या चक्का जाम आंदोलनादरम्यान शेतकरी व कार्यकर्त्यांना कासोदा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश राजपूत यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत १५ ऑगस्टपर्यंत संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यास पोलिस अधीक्षक कार्यालयात उपोषण छेडण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाने दिला आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, आंदोलनाच्या ठिकाणी पोहचून सहाय्यक निरीक्षक राजपूत यांनी “तुमचं फोटोशेशन झालं असेल तर ही नौटंकी बंद करा” असे अपमानास्पद शब्द वापरले. या घटनेचा व्हिडीओ वरिष्ठ अधिकाऱ्यांना मेलद्वारे पाठवण्यात आला असूनही अद्याप कुठलीही कारवाई झाली नाही.
या प्रकरणी पोलिस अधीक्षक जळगाव, जिल्हाधिकारी जळगाव व पोलिस कमिशनर नाशिक यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे एरंडोल तालुका अध्यक्ष सुनिल पाटील उमरेकर, तालुका सरचिटणीस अनिल पाटील, माजी सरपंच सुनिल दयाराम पाटील, तसेच मनोहर मगर, विजय माधवराव महाजन, सुनिल हरगुडे, राजेंद्र फणसे, सचिन पाटील, अभिनव पाटील यांच्या सह्या आहेत.
१५ ऑगस्टच्या आत निलंबन किंवा तडका फडकी बदली न झाल्यास प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन व उपोषण करतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
