अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – तालुक्यात सध्या रासायनिक खतांचा विशेषतः युरिया खताचा तीव्र तुटवडा जाणवत असून, शासनाने निर्देशित केलेल्या दुकानांसमोर पहाटेपासूनच शेतकरी आधारकार्ड घेऊन रांगेत उभे राहत आहेत. अनेक कुटुंबांतील माता-भगिनींनाही केवळ दोन बॅगा खतासाठी तासनतास उन्हात उभं राहावं लागतंय, ही बाब अत्यंत दुःखदायक असल्याचं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलं.
या पार्श्वभूमीवर, तालुक्यातील विविध राजकीय पक्ष, संघटना आणि शेतकरी प्रतिनिधींनी एकत्र येत तालुका कृषी विभाग व पंचायत समितीला निवेदन दिलं. या निवेदनात, ज्या दुकानांमध्ये रासायनिक खतांची साठवणूक किंवा काळाबाजार होत असेल, अशा दुकानांची पारदर्शक चौकशी करण्यात यावी आणि तालुक्यासाठी वाढीव प्रमाणात खतांचा पुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदन देताना मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अरुण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष समाधान पाटील, वसंत चव्हाण, सुधीर आबा पाटील, रयत क्रांती सेनेचे डॉ. अजय पाटील, राष्ट्रीय जनमंचचे संदीप लांडगे, तसेच सामाजिक कार्यकर्ते रामलाल चौधरी, संतोष (आबा) राजपूत व इतर अनेक शेतकरी उपस्थित होते.
जर वेळेत खतांचा पुरवठा सुरळीत न झाल्यास, शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मराठा सेवा संघातर्फे देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
