अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
चाळीसगाव (प्रतिनिधी) – स्वच्छ भारत सुंदर भारत या अभियानांतर्गत श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात व इको क्लब यांच्या तर्फे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ई-कचरा संकलन केंद्र सुरू करण्यात आले.
या केंद्राचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक तसेच इको क्लबचे अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष शामकांत सोनवणे, संचालक भागवत सानप व अर्चना नाईक उपस्थित होते.

मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाअंतर्गत ई-कचरा आणणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट दिले जाणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत असून ती पृथ्वीसमोरील गंभीर आव्हान ठरत आहे. त्यामुळे शालेय स्तरावरून जनजागृती करणे आवश्यक असल्याचे आयोजकांनी सांगितले.

शाळेतील विद्यार्थ्यांना फक्त अभ्यासापुरते न मर्यादित ठेवता, परिसरातील घडामोडी व त्यांचे सामाजिक महत्त्व समजणे गरजेचे आहे. कचरा व्यवस्थापन, स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षण या बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येईल. हा उपक्रम वर्षभर चालणार असून जळगाव शहर कचरा मुक्त करण्यासाठीही प्रयत्न होणार आहेत.
विद्यार्थ्यांना या माध्यमातून मार्गदर्शन मिळाल्यानंतर ते आपल्या परिसरात चेंज मेसेंजर म्हणून कार्य करतील आणि जनजागृती घडवून आणतील, असे अध्यक्ष प्रशांत नाईक यांनी यावेळी सांगितले.
