अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – शहरात काल (मंगळवार) रात्री उशिरा घडलेल्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. भाजपचे माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी स्टेशन रोड येथील नगरपालिका कॉम्प्लेक्स समोर जीवघेणा हल्ला केला. हा हल्ला रात्री सुमारे ११ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास घडला. गंभीर जखमी अवस्थेत चौधरी यांना तातडीने उपचारासाठी देवरे हॉस्पिटल येथे घेऊन जाण्यात आले होते मात्र पुढील उपचारासाठी धुळे येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
या हल्ल्यात धारदार शस्त्र व कोयत्याने चौधरी यांच्या तोंडावर, मानेवर, छातीवर, हातावर तसेच पायावर गंभीर दुखापती झाल्या असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. हल्लेखोरांनी अचानक हल्ला करून घटनास्थळावरून पलायन केले.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. चौधरी यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आली आहेत.
अचानक घडलेल्या या हल्ल्याच्या घटनेचे कारण अद्याप समोर आलेले नसून पुढील तपास चाळीसगाव शहर पोलिस करीत आहेत.
