अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव (प्रतिनिधी) – श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे भारतीय डाक विभागाच्या वतीने आधार कार्ड अपडेट व सुकन्या समृद्धी योजना शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये शालेय विद्यार्थी तसेच परिसरातील नागरिकांना आधार कार्डसंबंधी आवश्यक त्या सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विशेषतः वय वर्षे ५, १५ व १८ पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवरील फोटो, बायोमेट्रिक, मोबाईल क्रमांक व मेल आयडी अपडेट करणे बंधनकारक असल्याने याचा थेट फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे.
पाच ते पंधरा वर्षांखालील मुलांचे बायोमेट्रिक अपडेट व नवीन आधार कार्ड पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे. पुढील वर्गात प्रवेश घेणे, शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणे यासाठी आधार अपडेट महत्त्वाचे असल्याने हे शिबिर विद्यार्थ्यांसाठी उपयोगी ठरणार आहे, असे संस्थेचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांनी सांगितले.
तसेच मुलींसाठी बचतप्रधान सुकन्या समृद्धी योजना याबाबतही मार्गदर्शन करून खाते उघडणीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलींच्या भविष्यासाठी या योजनेंतर्गत खात्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शालेय विद्यार्थी व परिसरातील नागरिकांनी या उपयुक्त शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी केले आहे.
