अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
चाळीसगाव (प्रतिनिधी)- दिनांक २८ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास हतनूर (ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) येथील मंगेश बंडू आल्हाट (वय २२) हे दोन मित्रांसह मोटारसायकलवरून धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गाने चाळीसगावकडे येत होते. रस्त्याच्या कडेला लघवीसाठी थांबल्यानंतर एका रिक्षातून उतरलेल्या तीन अनोळखी युवकांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला.
या आरोपींपैकी एकाच्या हातात चाकू होता. “इतक्या रात्री येथे काय करताय?” असे विचारून त्यांनी तिघांना पकडले. भीतीपोटी साक्षीदार विशाल केवट तेथून पळून गेले, तर एका आरोपीने मंगेश आल्हाट यांच्या डाव्या हातावर चाकूने वार करून त्यांच्या खिशातील ६,४०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. उर्वरित दोन आरोपींनी साक्षीदार निवृत्ती भडंग यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांचा इन्फिनिक्स कंपनीचा मोबाईल फोन लुटला. त्यानंतर तिन्ही आरोपींनी रिक्षाने पळ काढला.
या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.रं. ३७३/२०२५ अन्वये BNS-२०२३ चे कलम ३०९ (४), ३०९ (६) व ३११ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देत तत्काळ तपास पथक रवाना केले.
पो.उपनि. प्रदीप शेवाळे, श्रे पोउनि गोपाळ पाटील, स.फौ. युवराज नाईक, स.फौ. संजय गायकवाड, पोहवा संदीप माने, संदीप पाटील, विजय पाटील, विकास चव्हाण, सुनिल पाटील, किरण देवरे, चालक सचिन वाघ व ईश्वर पाटील आदींच्या पथकाने गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित ऋषिकेश कासार यास त्याच्या रिक्षासह ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्हा गणेश महेंद्र पवार व रमेश उर्फ वाल्मिक सोमनाथ सुपलेकर (रा. चामुंडा माता मंदिराजवळ, जय बाबाजी चौक, ता. चाळीसगाव) यांच्यासह केल्याची कबुली दिली.
तपासादरम्यान आरोपींकडून लुटीतील ४,१०० रुपये रोख, लुटलेला मोबाईल फोन तसेच गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पो.उपनि. प्रदीप शेवाळे करीत असून, हा तपास पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
