अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
चाळीसगाव(प्रतिनिधी)- नगरपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.निवडणूक प्रक्रियेनंतर नगरपरिषदेत पक्षांचे संख्याबळ स्पष्ट झाले असले, तरी स्वीकृत नगरसेवक पदाबाबतचा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.त्यामुळे या पदासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये चुरस निर्माण झाली असून राजकीय वातावरण तापले आहे.
स्वीकृत नगरसेवक पदासाठी विविध पक्षांतील अनेक इच्छुक पुढे आले असून आपले नाव अंतिम यादीत यावे, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. वरिष्ठ नेते, आमदार, पक्षाचे पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधत शिफारशी मिळवण्यावर भर दिला जात आहे. काही कार्यकर्ते पक्षासाठी केलेल्या योगदानाचा दाखला देत आहेत, तर काहीजण संघटनात्मक कामगिरी आणि जनसंपर्काचा आधार मांडत आहेत.
या पदाला विशेष महत्त्व असल्याने प्रत्येक पक्षात अंतर्गत चर्चा सुरू असून कोणाला संधी द्यावी, याबाबत मतभेदही दिसून येत आहेत. नगरपरिषदेतील सत्ता-समीकरणे लक्षात घेता स्वीकृत नगरसेवकांची निवड ही आगामी धोरणात्मक निर्णयांवर प्रभाव टाकणारी ठरणार आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी या निवडीकडे गांभीर्याने पाहत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, कोणाच्या गळ्यात स्वीकृत नगरसेवक पदाची माळ पडणार, याचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेणार असून स्थानिक पातळीवरील चर्चा आणि अंदाज यांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. आगामी काही दिवसांत ही घोषणा होण्याची शक्यता असून, त्या निर्णयाकडे चाळीसगाव शहराचे लक्ष लागून राहिले आहे.
