अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)-नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच अपघातांना आळा घालण्यासाठी चाळीसगाव शहर वाहतूक शाखेने कडक कारवाईचा बडगा उगारला होता. ३० व ३१ डिसेंबर या दोन दिवसांत दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या (ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह) वाहनचालकांविरोधात एकूण २४ केसेस दाखल करण्यात आल्या आहेत.
तसेच मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या १९२ वाहनधारकांवर कारवाई करत १ लाख ७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, महाराणा प्रताप चौक, खरजई नाका या प्रमुख ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती. यासोबतच शहरात सघन पेट्रोलिंगही करण्यात आली.
या कारवाईदरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणारे तसेच आवश्यक कागदपत्रांशिवाय वाहन चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली.
२०२५ वर्ष संपत असताना करण्यात आलेली ही दणक्याची कारवाई दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांसाठी नवीन वर्षात इशारा ठरली आहे.
वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप एकशिंगे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचे पालन करावे, मद्यपान करून वाहन चालवू नये, अन्यथा भविष्यातही अशीच कठोर कारवाई करण्यात येईल.
