अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- “नवसंघर्ष… नवा विश्वास… नवी वाटचाल” या शब्दांतूनच चाळीसगावच्या राजकारणातील नवीन वर्षातील बदल बोलका ठरला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चाळीसगाव शहर कार्याध्यक्ष दीपक चौधरी यांनी १ जानेवारी आपल्या वाढदिवस व नववर्षाच्या शुभमुहूर्तावर भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश करत स्थानिक राजकीय समीकरणे ढवळून काढली आहेत.
सातत्याने जनसेवेत सक्रिय, संघटनात्मक कामाचा प्रदीर्घ अनुभव आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद राखणारे दीपक चौधरी यांचा भाजपात प्रवेश हा पक्षासाठी ताकद वाढवणारा मानला जात आहे. मात्र, हा प्रवेश जितका भाजपासाठी लाभदायक, तितकाच तो राष्ट्रवादी (अजित पवार गट) साठी अस्वस्थ करणारा धक्का ठरत असल्याची चर्चा आहे.
विशेष म्हणजे, नगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन अवघे काही दिवस उलटत नाहीत, तोच हा पक्षबदल झाल्याने अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. शहर व तालुक्यातील पदाधिकारी आणि उमेदवारांमध्ये निर्माण झालेली वरिष्ठांबद्दलची नाराजीच या निर्णयामागे आहे का? असा थेट सवाल आता कार्यकर्त्यांमधून उपस्थित होत आहे.
जर ही नाराजी केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित नसून व्यापक असेल, तर येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधून भाजपामध्ये मोठ्या प्रमाणावर ‘इनकमिंग’ सुरू होण्याचे संकेत मानले जात आहेत. दीपक चौधरी यांचा प्रवेश हा एकट्याचा निर्णय न राहता, अंतर्गत अस्वस्थतेचा राजकीय आरसा ठरतो की काय, याकडे आता चाळीसगावचे लक्ष लागले आहे.
