Oplus_16908288
अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
यावल(प्रतिनिधी)- यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या खळबळजनक जबरी चोरीच्या गुन्ह्याचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) यशस्वी उलगडा करत १३ लाखांच्या रकमेसहित तिन्ही सराईत आरोपींना अटक केल्यानंतर आता या प्रकरणातील आणखी दोन आरोपींचा शोध सुरू केला आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीतून गुन्ह्याचे धागेदोरे धुळे जिल्ह्यापर्यंत पोहोचले असून, फरार सूत्रधार साहिल सत्तार शहा व साहिल शहा याच्या अटकेसाठी पोलीस पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहे.
एलसीबीने ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार, जबरी चोरीची ही घटना पूर्वनियोजित पद्धतीने करण्यात आली होती. टोळीतील सदस्यांनी घटनास्थळाची पाहणी करून मार्ग, वेळ आणि संभाव्य अडथळ्यांचा अभ्यास केला होता. चोरीनंतर लुटीची रक्कम वेगवेगळ्या ठिकाणी विभागून ठेवण्यात आली होती, जेणेकरून पोलिसांची दिशाभूल करता येईल. मात्र, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी हा डाव उधळून लावला.
दरम्यान, अटक आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, पुढील तपासासाठी त्यांची पोलीस कोठडी मिळवण्यात आली आहे. या कोठडीदरम्यान फरार आरोपींबाबत अधिक माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, फरार साहिल शहा याच्यावर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून तो गुन्हेगारी टोळीचा कणा मानला जातो.
या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, उर्वरित दोन फरार आरोपींच्या अटकेनंतर आणखी मोठ्या गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात वाढत असलेल्या जबरी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवली असून, संशयितांवर करडी नजर ठेवण्यात येत आहे.
नागरिकांनीही संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
