अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- ३१ डिसेंबर २०२५ रोजी गडकिल्ल्यांवर दारू-मटणाच्या पार्ट्या करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल राजपूत यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान गेली अनेक वर्षे महाराष्ट्रातील विविध गडकिल्ल्यांवर संवर्धन व स्वच्छता अभियान राबवत असून गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक व धार्मिक पावित्र्य जपण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्रातील सर्व गड-किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेतील बलस्थाने असून, या भूमीसाठी असंख्य मावळ्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. या किल्ल्यांवर वीरांच्या समाध्या तसेच देवी-देवतांची मंदिरे असल्याने गड-किल्ले पवित्र तीर्थस्थाने असल्याची भावना गडप्रेमी व शिवप्रेमी नागरिकांची आहे.
मात्र दरवर्षी ३१ डिसेंबर रोजी काही समाजकंटक पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करत गडकिल्ल्यांवर दारू-मटणाच्या पार्ट्यांचे आयोजन करून धिंगाणा घालतात. यामुळे गडकिल्ल्यांचे पावित्र्य भंग होते तसेच गडप्रेमी व शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या जातात. परिणामी वाद-विवाद व अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या पार्श्वभूमीवर चाळीसगाव तालुक्यातील किल्ले राजदेहरे, किल्ले कन्हेरगड व किल्ले मल्हारगड या ठिकाणी ३१ डिसेंबर २०२५ रोजी किल्ल्यांच्या पायथ्याशी पोलीस गस्त ठेवावी, तसेच दारू-मटणाच्या पार्ट्या करणारे आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. भविष्यात अशा प्रकारचे प्रकार घडू नयेत, यासाठी ही कारवाई आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
तसेच पोलीस प्रशासनाला आवश्यकता भासल्यास, सह्याद्री प्रतिष्ठानचे सदस्य पोलीसांच्या मार्गदर्शनाखाली सहकार्य करण्यास सदैव तयार असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
हे निवेदन देताना सह्याद्री प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष दिलीप घोरपडे, राज्य सदस्य सचिन पाटील, तालुका प्रमुख पप्पू पाटील, शहराध्यक्ष सचिन पैलवान पाटील, ललित अशोक चौधरी, नानाभाऊ चौधरी, सुरेश ठाकरे, मयूर भागवत यांच्यासह अनेक दुर्गसेवक उपस्थित होते.
