अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
चाळीसगाव (प्रतिनिधी) —वराही फार्म्स प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून तब्बल ३० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यापाऱ्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
फिर्यादी योगेश अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, वराही फार्म्स कंपनीमार्फत शेतकऱ्यांकडून मका, कडधान्य, अडूक, कांदा आदी शेतीमालाची खरेदी करण्यात येत होती. हा माल प्रक्रिया करून त्याची विक्री केली जात होती. या व्यवहारासाठी प्रसाद कन्हासिंग व एस.एस. ट्रेडर्सचे मालक सुनील रमेशचंद्र केडिया (रा. केडिया भवन, अकोला रोड, खामगाव, जि. बुलढाणा) यांच्याशी संपर्क साधण्यात आला.सदर व्यापाऱ्याने “माल आधी पाठवा, त्यानंतर पैसे देतो,” असे आश्वासन दिल्याने विश्वास ठेवून ७ नोव्हेंबर २०२४ रोजी मोठ्या प्रमाणावर माल पाठवण्यात आला.
दररोज सुमारे २९ हजार ३०० किलो मका रोडलाईन्सच्या एका ट्रकद्वारे पाठवण्यात आला. मात्र, माल पोहोचल्यानंतरही पैसे अदा करण्यात आले नाहीत.याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही पैसे न दिल्याने एकूण ३० लाख ५५ हजार ४८० रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
उलट व्यापाऱ्याने खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे.या प्रकरणी सुनील केडिया, ललित केडिया व वहिनी अनिता केडिया यांनी संगनमताने विश्वासघात करून फसवणूक केल्याचा आरोप असून, त्यांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
