अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) —पत्रकार हे समाजाचे चौथे स्तंभ मानले जातात. दिवसरात्र समाजहितासाठी कार्य करत असताना अनेक वेळा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. ही बाब लक्षात घेऊन व्हॉईस ऑफ मीडिया – आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना, चाळीसगाव यांच्या वतीने व्हॉईस ऑफ मिडियाचे सभासद असलेल्या पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे आरोग्य शिबिर मंगळवार, दि. ६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत अरिहंत मंगल कार्यालय, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ, चाळीसगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरासाठी पत्रकारांची उपस्थिती प्रार्थनीय असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.
या शिबिरामध्ये हिमोग्लोबिन तपासणी, मधुमेह (शुगर) तपासणी, रक्तदाब तपासणी, ECG, CBC, बी.एम.आय. (शरीर वस्तुमान निर्देशांक), किडनी तपासणी, थायरॉईड तपासणी, लिव्हर तपासणी, संधिवात तपासणी, एक्स-रे तपासणी तसेच लहान मुलांची तपासणी आदी विविध आरोग्य तपासण्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत करण्यात येणार आहेत. तसेच आवश्यकतेनुसार आरोग्यविषयक मार्गदर्शनही दिले जाणार आहे.
या शिबिराचे उद्घाटन मा. सौ. प्रतिभाताई मंगेशदादा चव्हाण (नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा, न.पा. चाळीसगाव) यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार मा. श्री. सुरेश उज्जैनवाल यांची विशेष उपस्थिती लाभणार असून ते “पत्रकार संघटनात्मक ताकद आणि लोकशाहीतील भूमिका” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
या उपक्रमाच्या माध्यमातून पत्रकारांचे आरोग्य सुदृढ ठेवण्याचा तसेच संघटनात्मक बळकटी साधण्याचा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले. व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
