अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- अनधिकृत खनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या वाहनांच्या लिलाव प्रक्रियेची नोटीस प्रसिद्ध होताच संबंधित वाहनमालकांनी तातडीने दंडाची रक्कम शासनाकडे जमा करून आपली वाहने सोडवून घेतल्याची माहिती महसूल प्रशासनाकडून देण्यात आली आहे.एकूण ५ वाहनचालकांनी दंड भरला असून त्यामध्ये ३ ट्रॅक्टर ट्रॉली व २ ओमनी वाहनांचा समावेश आहे.
महसूल विभागाने अनधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरुद्ध कारवाई करत विविध ठिकाणी छापे टाकून संबंधित वाहने जप्त केली होती. जप्त वाहनांबाबत नियमानुसार दंड आकारण्यात आला होता. मात्र काही वाहनमालकांनी निर्धारित मुदतीत दंड न भरल्याने संबंधित वाहनांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करण्याबाबत नोटीस काढण्यात आली होती.
लिलावाची अधिकृत नोटीस प्रसिद्ध होताच वाहनमालकांनी प्रशासनाशी संपर्क साधून दंडाची संपूर्ण रक्कम भरून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली.
प्रशासनाच्या कठोर भूमिकेमुळे आणि लिलावाची प्रक्रिया सुरू होणार असल्याच्या स्पष्ट सूचनेमुळे संबंधित वाहनमालकांनी विलंब न करता शासनाचा महसूल जमा केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शासनाच्या तिजोरीत महसूल जमा झाला असून अनधिकृत उत्खननाविरुद्धच्या कारवाईला अधिक बळ मिळाले आहे.
दरम्यान, उर्वरित दोन वाहनांच्या दिनांक ११ जानेवारी रोजी होणाऱ्या लिलावासाठी अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. लिलावासाठी जाहीर करण्यात आलेल्या तारखेला नागरिकांकडून सहभाग न मिळाल्याने संबंधित वाहनांची लिलाव प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. त्यामुळे आता नव्याने जिल्हाधिकारी यांच्याकडून परवानगी घेऊन लिलावाची पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
तहसीलदार प्रशांत पाटील यांनी सांगितले की, “जप्त वाहनांच्या संदर्भात सर्व प्रक्रिया नियमांनुसार पार पाडली जात आहे. ज्यांनी दंड भरला आहे, त्यांची वाहने सोडविण्यात आली आहेत. उर्वरित वाहनांसाठी जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेनंतर लवकरच नव्या तारखेसह लिलाव प्रक्रिया राबविण्यात येईल.”
