Oplus_16908288
प्रतिकात्मक चित्र
अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)-जळगाव जिल्ह्यातील वेगाने विकसित होत असलेल्या चाळीसगाव तालुक्याने स्वतंत्र जिल्हा निर्मितीच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. शहरात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाला मंजुरी मिळाल्यानंतर आता अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयालाही मंजुरी मिळाल्याने चाळीसगावमध्ये जिल्हास्तरीय प्रशासकीय सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला असून प्रशासकीय आणि न्यायिक व्यवस्थेला नवे बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण असलेल्या चाळीसगाव तालुक्यात गेल्या काही वर्षांत लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र महसूल, न्यायालयीन, आरोग्य तसेच परिवहन विभागाशी संबंधित अनेक कामांसाठी नागरिकांना सुमारे १०० किलोमीटर अंतरावरील जळगाव येथे जावे लागत होते. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वारंवार पुढे येत होत्या. परिणामी प्रशासकीय सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत होती.
या पार्श्वभूमीवर चाळीसगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाला मंजुरी मिळाल्याने गुन्हेगारी, दिवाणी आणि फौजदारी प्रकरणांच्या सुनावण्या स्थानिक पातळीवरच होऊ शकणार आहेत. त्यामुळे न्यायालयात वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या निकाली प्रक्रियेला वेग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हा निर्णय मोठा दिलासा देणारा ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
वाढत्या लोकसंख्येसह भौगोलिक विस्तार आणि महसूल विभागावरील ताण लक्षात घेऊन राज्य मंत्रिमंडळाने राज्यात ११ ठिकाणी अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावचाही समावेश करण्यात आला आहे. या कार्यालयासाठी लवकरच अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांसह इतर १३ पदांची भरती केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
प्रशासनाचा विस्तार आणि विकेंद्रीकरण या दृष्टीने चाळीसगाव येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याचा निर्णय महसूल व्यवस्थेसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. त्यामुळे प्रशासन अधिक गतिमान आणि लोकाभिमुख होण्यास मदत होईल. सातबारा, फेरफार, नामांतरण तसेच विविध दाखल्यांशी संबंधित कामे अधिक वेगाने पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चाळीसगावच्या स्वतंत्र जिल्हा निर्मितीकडे वाढणारे विकासाचे पाऊल…
चाळीसगावला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. त्यासाठी आवश्यक असलेली प्रशासकीय यंत्रणा, न्यायालयीन व्यवस्था, आरोग्य सुविधा आणि महसूल कार्यालयांची उभारणी हे महत्त्वाचे निकष मानले जातात. चाळीसगावमध्ये टप्प्याटप्प्याने या सुविधा आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांनी उपलब्ध होत असल्याने स्वतंत्र जिल्हा निर्मितीच्या दिशेने सुरू असलेला विकास स्पष्ट दिसत आहे.
