अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
पारोळा(प्रतिनिधी)-जळगाव पोलिसांनी पारोळा तालुक्यात मोठी कारवाई करत बेकायदेशीररीत्या साठवून ठेवलेल्या रसायन साठ्यावर छापा टाकून तब्बल ९ लाख ३२ हजार १२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एका संशयिताविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ११ मे २०२६ रोजी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ लगत म्हसवे शिवारातील रामदेव राजस्थानी चौधरी हॉटेलच्या मागील बाजूस दिनेश पोपटराव पाटील हा इसम ‘सोडियम बाय सल्फेट’ रसायनांचा असुरक्षित व बेकायदेशीर साठा करून काळ्या बाजारात विक्रीसाठी ठेवत आहे. या माहितीची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षकांनी पारोळा पोलीस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदारांचे विशेष पथक तयार करून तात्काळ कारवाईचे आदेश दिले.
त्यानुसार तयार करण्यात आलेल्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला असता आरोपी दिनेश पोपटराव पाटील (वय ४३, रा. प्रकाश टाकीमागे, खांडेकर वाडा, पारोळा) हा मोठ्या प्रमाणावर रसायनयुक्त पदार्थांसह आढळून आला. या कारवाईत पोलिसांनी १२ चाकी टाटा कंपनीचा टँकर, विविध टाक्यांमध्ये साठवलेले सुमारे ४८ हजार लिटरहून अधिक उग्र वासाचे रसायनयुक्त पदार्थ, मोटरसायकल, मोबाईल, रिकामे टँकर व मोटार असा एकूण ९ लाख ३२ हजार १२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १६४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम २७१, २७२, २८६, २८७, २८८, ३१६(३), ३१७(२) तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश महाजन करीत आहेत.
