अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
जळगाव(प्रतिनिधी)-IPL क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन सट्टा लावणाऱ्या अड्ड्यावर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून चार जणांना ताब्यात घेत 10 लाख 57 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई जामनेर पोलीस स्टेशन हद्दीतील हिवरखेडा रोड परिसरात करण्यात आली.
दिनांक 09 मे 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गुप्त माहिती मिळाली होती की, जामनेर येथील एका घरामध्ये IPL क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन सट्टा लावून जुगार सुरू आहे. माहितीची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले.
त्यानुसार Prob. DySP प्रशांत दरेकर, PSI शेखर डोमाळे तसेच स्थानिक गुन्हे शाखा व सायबर पोलीस स्टेशनच्या पथकाने मिळालेल्या माहितीची पडताळणी करून संबंधित ठिकाणी छापा टाकला. छाप्यात IPL सामन्यावर ऑनलाईन सट्टा सुरू असल्याचे निष्पन्न झाले.
या कारवाईत पोलिसांनी देवानंद सुभाष सोनवणे, रितेश अशोक नेरकर, परीक्षित रविंद्र पाटील व प्रवीण जगन्नाथ टहाकडे (सर्व रा. जामनेर) यांना ताब्यात घेतले.
छाप्यात पोलिसांनी 9 लाख 2 हजार 300 रुपये रोख रक्कम, 1 लाख 30 हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन, 25 हजार रुपये किमतीचा टीव्ही व साउंड बार, 41 एटीएम कार्ड तसेच इतर साहित्य असा एकूण 10 लाख 57 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी जामनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 236/26 अन्वये महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 4 व 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
