अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
धरणगाव(प्रतिनिधी)-: जिल्ह्यात अवैधरित्या घातक शस्त्रे व अग्नीशस्त्रे बाळगणाऱ्या इसमांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिल्यानंतर धरणगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत गावठी बनावटीच्या पिस्टलसह एका आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभारी अधिकारी सुनिल पवार यांनी धरणगाव पोलीस स्टेशनअंतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांना अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात गोपनीय माहिती संकलित करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
दि. १४ मे २०२६ रोजी दुपारी सुमारे २:३० वाजेच्या सुमारास पाळधी पोलीस दूरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक भूषण कोते हे आपल्या पथकासह दोनगाव (ता. धरणगाव) शिवारातील गिरणा नदीपात्रात अवैध रेती वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी नदीपात्रात एक इसम संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला.
सदर इसमाकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संशय बळावल्याने पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून २५ हजार रुपये किमतीची गावठी बनावटीची मॅगझीनसह एक पिस्टल जप्त करण्यात आली.
या प्रकरणी आरोपी आनंदा बळीराम सपकाळे (वय ३९, रा. आव्हाणे, ता. जळगाव) याच्याविरोधात धरणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक १८७/२०२६ अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय बडगुजर हे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या मोहिमेत सहायक पोलीस निरीक्षक भूषण कोते, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय बडगुजर, पो. कॉ. ज्ञानेश्वर बाविस्कर, रविंद्र चौधरी आणि विशाल पाटील यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.
