अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
भुसावळ(प्रतिनिधी)- जळगाव जिल्ह्यात वाढत्या अमली पदार्थ तस्करी व सेवनावर आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून जोरदार मोहिमा राबविल्या जात आहेत. याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा जळगाव व भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त कारवाईत मध्यप्रदेशातील एका इसमाला गांजासह रंगेहाथ पकडण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.
दिनांक २२ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पो.हे.कॉ. गोपाळ गव्हाळे यांना गुप्त माहिती मिळाली की, भुसावळ शहरात काळ्या रंगाच्या होन्डा शाईन मोटारसायकलवरून अवैध गांज्याची वाहतूक केली जात आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पथक तयार करण्यात आले. दरम्यान, ही माहिती भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यालाही देण्यात आली. त्यानंतर हॉटेल सुरुची इन समोरील राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोडवर संयुक्त पथकाने सापळा रचला.
यावेळी, नमूद वर्णनाप्रमाणे काळ्या रंगाच्या सी.बी. होंडा शाईन मोटारसायकलवरून एक इसम येताना दिसला. पोलिसांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला असता तो पसार होण्याचा प्रयत्न करीत होता; मात्र पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव अनारसिंग वालसिंग भिलाला (वय ३०, रा. शमलकोट, ता. झिरण्या, जि. खरगोन, मध्यप्रदेश) असे सांगितले.
तपासात त्याच्या ताब्यातून २ लाख ५ हजार ५०० रुपये किमतीचा एकूण १०.२७५ किलो गांजा, ७५ हजार रुपये किमतीची सी.बी.होंडा शाईन मोटारसायकल (क्र. MP-09-VM-4395) तसेच १० हजार रुपयांचा मोबाईल हॅन्डसेट असा मिळून एकूण २ लाख ९० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पो.ना. विकास सातदिवे यांच्या फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात एन डी पी एस ऍक्ट 1985 कलम 20 (ब), 22 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भुसावळ बाजारपेठ पोलीस करीत आहेत.
ही कारवाई डॉ. महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक, जळगाव), अशोक नखाते (अपर पोलीस अधीक्षक, जळगाव परिमंडळ), संदीप गावीत (उपविभागीय पोलीस अधिकारी, भुसावळ उपविभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील, भुसावळ बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ, सहा.पो.निरीक्षक नितीन पाटील तसेच गुन्हे शाखा व भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
